फिटे अंधाराचे जाळे
DAY 19/30/19/JUNE/2020 
फिटे अंधाराचे जाळे
बिग एफएम ९५.५ वर ४ ते ५ बंड्याचा 'चार चा चहा' कार्यक्रम मला भयंकर आवडतो. आज असाच वाफाळलेला चहाचा कप घेऊन बसलो आणि कार्यकम सुरू झाला. पहिलंच गाणं वाजलं, 'फिटे अंधाराचे जाळे' आणि एकदम तोंडातून दाद निघाली "अहाहा".
'लक्ष्मीची पाऊले' ह्या चित्रपटातील हे गाणं. शब्द अर्थात कविवर्य सुधीर मोघे आणि संगीत श्रीधर फडके. ह्या गण्याचे एक वैशिष्ठ म्हणजे, श्रीधर फडक्यांनी चाल दिलेलं गाणं, चक्क बाबूजी गायलेत. ह्या तिघांसाठी ती "अहाहा" ची दाद. 
सुधीर मोघ्याच्या कविता आणि गाणी मला नेहमीच भावतात. ह्या गीताचे शब्दच इतके सकारात्मक आहेत की खरच मळभ सरून आकाश निरभ्र झाल्यासारखं वाटतं.  
"फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश"
इथे फिटे आणि मोकळे हे शब्द असे भासतात की एखाद्या सावकाराकडून घेतलेले कर्ज फिटल्यामुळे शेतकऱ्याला जो मोकळेपणा वाटेल, तितका मोकळेपणा आकाशाला अंधार फिटल्यामुळे वाटतो. ते मोकळं होणं ऐकून, वाचून, आपल्याही मोकळं झाल्याची भावना येते. पुढच्या ओळी ही अतिशय सुंदर आहेत.
एखाद्या खोऱ्यातून, खळखळून पाण्याचा मोठा झरा वाहत जाईल, त्याच प्रमाणे इथे उगवत्या सूर्याची किरणं, वाढत्या क्रमाने श्रुष्टीला व्यापात जातात. असे होताना तो प्रकाश, ते किरण अक्षरशः वाहत असल्यासारखे भासतात. ह्या दोन ओळींमध्येच हे गीत हृदयाचा ठाव घेते. 
पुढच्या ओळी अश्या आहेत. त्या गीताच्या ओळींपेक्षा मला जास्त रंगवलेल्या चित्रसारखेच दिसते.
"रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या.एक अनोखे लावण्य, आले भरास भरास"
सूर्य उगवताना, हळू हळू गाव जागे व्हायला लागतं. गावात, घरात हळू हळू हालचाल हाऊ लागते त्याचप्रमाणे निसर्गात होणाऱ्या ह्या बारीक हालचाली इतक्या नेमके पणाने टिपले आहेत.
रान जागे झाले, पायवाटा जाग्या झाल्या. खरं म्हणजे पायवाटा तिथेच आहेत, पण लोकांच्या हालचाली मुळे पायवाटा ही झोपी गेलेली आता हळू हळू जाग्या व्हायला लागल्यात. क्या बात है। आपण लहानपणी निसर्ग चित्र कधी म्हंटल की दोन डोंगर आणि त्या मध्ये अर्धा सूर्य हेच किती तरी वर्ष काढलंय. पुढच्या ओळीत मला तेच दिसतं. सूर्य ही तिथंच आहे, पण दिवस रात्रीच्या खेळामध्ये रोज सूर्य नव्याने जन्म घेऊन संध्याकाळी अस्ताला जातो. म्हणजे एक दिवसात सूर्याचा पूर्ण जन्म संपून तो पुन्हा जन्म घ्यायला तयार होतो. आणि ह्या सूर्याच्या जन्माने प्रकाश सर्वस्त्र पसरतो. इथे इतका सुंदर विचार केलाय मोघे साहेबांनी, सूर्या बरोबर जन्माला येतात सावल्या. म्हणजे सूर्य त्याच्या अस्तित्वाची दोन रूपं दाखवतो, जिथे एकीकडे लाखळखणारा सूर्य आहे, तर दुसरीकडे सावलीच्या रुपात ही तोच शाबूत आहे. आणि एकाची प्रखरता दुसऱ्याची किंमत जाणवून देते. म्हणजे की कल्पना मला आई वाडीलांसारखीच वाटते. शेवटी आई वडील हे पाल्यांसाठी एकाच ममतेची दोन रूपं आहेत. जेव्हा दोघे शांत असतात तेव्हा झुंजूमंजू झाल्यासारखे किंवा संधीप्रकाशासरखे आल्हाददायक वाटते. तसेच मध्येच वडील सूर्या सारखे तळपले की आई शांत सवलीसारखी छाया देते. तसेच फार दिवस वडील कामानिमित्त गावाबाहेर गेले की त्यांची ऊब हवी हवीशी वाटते जरी जवळ सावली असली तरी. आणि ह्या ऊन सावलीच्या खेळामध्ये सारी श्रुष्टी एक लावण्यवती सारखे भरभरून रुपास येते. अप्रतिम!!
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास
ह्या पहाटेच्या दव बिंदूंना प्राशन करून, ती गवताची पाती नव्याने तरुण झाली आहेत. तसंच पाखरंही त्याच मंजुळपणे तोच चिवचिवाट करताहेत. पण हे सूर्याचं रोज नव्याने जन्माला येणे, सगळ्या चरा चरात नवीन प्राण फुंकतोय असे जाणवते. म्हणू दव रोजचंच आहे, गाणी रोजचीच आहेत, पण ती नव्याने जाणवतात. म्हणजे इथे आयुष्याचे फार मौलिक मार्गदर्शन आपल्याला फडके साहेबांकडून मिळते की आयुष्यात रोज रोज नवीन पणा येणं अवघड आहे, पण आपल्याकडे जे आहे त्यालाच नव्याने उपाभोगणे, साजरे करणे, अपरूप वाटणे हे मनुष्याकडून अपेक्षित आहे. तीच त्याच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे असे कवीला सुचवायचे आहे. ह्या विचारांच्या नाविनन्यामुळे कालची उदासी, कालची मरगळ, सगळायचाच कायापालट होतो आणि जीवनाला एक नवीन उमेद मिळते.
"झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास"
इथेही कवी असा संदेश देतात की जन्म, मृत्यू, उदय, अस्त हे सारे अटळ आहेत. त्यात कोणीही फेरफार करूच शकत नाही. 
त्यामुळे ज्या प्रमाणे पूर्ण दिवसभर तळपत राहून, अस्ताला जाणारा सूर्य, जाता जाता आपले उरले सुरले प्राण, म्हणजेच किरणांचा प्रकाश त्या चांदण्यात फुंकतो आणि लोप पावतो. म्हणजे आपण जाता जाता सुद्धा कोणाचे तरी कल्याण करू शकतो. इथे फारच अध्यात्मिक संदेश दिलेला आहे की आपल्या जवळचे दुसऱ्याला देऊन त्याचे आयुष्य लखलखीत करण्यातच माणुसकी आणि कर्तृत्व आहे. आणि इथे गीतांमध्ये जे शब्द वापरलेत ते केवळ लाजवाब आहे. कवी म्हणतो, "चांदण्यांना किरणांचा सोनसळी अभिषेक" म्हणजे राजा मिडास प्रमाणे, जात जात इतर जीवांना सोन्याचा स्पर्श करून जा. आणि ह्या अश्या कृत्यानेच माणसचे अस्तित्व मेल्यावरही अनेक काळ रातराणी प्रमाणे घामघमत राहील, दरवळत राहील.
अश्या ह्या दिग्गच कलाकारांच्या दिग्गच कलाकृतीतून आम्ही कित्येक दशकं तृप्त होत राहिलो आहोत आणि पूढे ही राहो. ह्या रचनेला आणि त्याच्या सांगितला सलाम!
© राहुल शिंदे https://tinyurl.com/y98dzs3h
© - Rahul Shinde 19/JUN/2020
अहाहा👌
ReplyDeleteमस्त 👏👏👏