उनाड शब्द, लबाड अर्थ

DAY 21/30/21/JUNE/2020 

उनाड शब्द, लबाड अर्थ
सुरेश भट साहेबांच्या ह्या ओळी बघा. खरं तर फक्त चार ओळी आहेत, पण त्याचा आशय किती खोल आहे. 
पहिल्या ओळीतच 'उनाड' हा शब्द थोडासा आश्चर्यकारक वाटतो. सहसा आपण उनाड हा शब्द सवय किंवा स्वभाव ह्या संदर्भात वापरतो. उनाड पोरं, उनाड स्वभावाची पोरं अशी आपण अनेक वाक्य ऐकलेली आहेत. पण उनाड शब्दाचा असा वापर करताना, कवीला नक्की काय सुचवायचे असेल? 
आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात. त्यातले काही आपण बोलबच्चम आहेत असे म्हणतो. ही लोकं फारच उथळ आणि हवेत बोलत असतात. पण त्यांची बोलायची तऱ्हा अशी असते की बरेचसे लोकं भारावून जातात, अगदी समर्पित होतात. कदाचित त्यांना ही जाणवत असेल पण त्यांची सद्सद विवेक बुद्धी काम करेंनाशीच होते आणि ते चक्क अश्या लोकांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवतात. आपण किती तरी वेळ बघतो रस्त्यावरचे विक्रेते, अनोळखी लोकं, भोंदू साधू आणि कसले कसले बाबा हे आपल्या साधेपणाचा, किंवा नावखेपणाचा सर्रास फायदा घेतात आणि आपण फसवले जातो. त्यामुळे इथे शब्द शाश्वत असले आणि त्यांचा अर्थ सरळ असला तरी शब्द वाहणाऱ्याच्या प्रवृत्तीला उनाड म्हणले असावे कदाचित. 
पुढे हे उनाड शब्द वळायास लागले. शब्द मुळात अक्षरांची जोड करून तयार होतात. काही अक्षरं मुळातच वळणदार असतात. उदारणार्थ क, ख, ग, घ, च, ब, न, व, आणि इत्यादी इत्यादी. आता ही अक्षरं जोडून शब्द तयार झाले की तेही वळणदार असणारच. पण इथे कवी वळायास लागले ह्याचा अर्थ प्रवृत्ती किंवा दिलेल्या खात्री ला कात्री लावत त्यांची चाल बदलू पाहताहेत. आपण असे शब्द मतदानाच्या वेळी खूप ऐकतो. विश्वास, खात्री, वचन, शब्द, शपथ, वगैरे वगैरे. हे शब्द त्या संदरभात ऐकल्यावरच आपण नाकं मुरडतो आणि हा उमेदवार काहीही करणार नाही असं मनाशी पक्क करतो. तसाच हे शब्द ही देणारे लोक जेव्हा त्यापासून परावृत्त होतात तेव्हा तिथे शब्द वळायला लागले असे कवी म्हणतो. 
पुढ्या ओळीत कवी लबाड हा शब्द इतक्या सुंदरपणे वापरतो. ह्या लबाड मध्ये एक लाडिक, नटखट किंवा थोडा खोडकर असा अर्थ प्रकट होतो. आणि ह्या दोन ओळी वरच्या दोन ओळींचा आशय बदलतात. दुसरा अर्थ सरळसोट आहे की वेगळे उद्देश किंवा वेगळे मनसुबे असल्याने एखादं कारस्थान केलं जातंय असा ही भाव येतो. 
भट सहबांच्या आशयाने बघायचे झाले तर नेमका अर्थ लावणे अवघड आहे. कारण जितकं दुःख भोगण्यावर आणि क्लेश होण्यावर परखड पणे ते लिहू शकतात आणि आपले दुःख थेट लोकांच्या अंतःकरणात उतरवू शकतात तितक्याच मार्दवपणे ते शृंगार आणि उत्कट भावनांवर लिहू शकतात. त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या संदर्भातून अर्थ घ्यावा. पण शब्द मांडण्याची काय अद्भुत किमया भट साहेबांना अवगत होती. म्हणूनच त्यांच्या सगळ्याच रचना अजरामर आहेत आणि म्हणूनच इतक्या सहजपणे ते कित्येक दशके मराठी लोकांच्या मनावर आदिराज्य करताहेत. अश्या ह्या हरहुन्नरी शब्दांच्या जादूगाराला मनाचा मुजरा.

© राहुल शिंदे


https://tinyurl.com/y8jjjuzf
© - Rahul Shinde 21/JUN/2020




Comments

  1. गजब रे किमया तुझ्या शब्दांची👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment