संवाद

DAY 28/30/28/JUNE/2020 




कवी सुधीर मोघे ह्यांची ही एक सुंदर कविता. दोन माणसांमधील नाते बांधायला खरच काय लागतं. सर्वात महत्वाचा म्हणजे दोघांमधला समजूतदार पणा, एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास,आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही बघण्याची क्षमता. जर ह्या चार गोष्टी जमल्या तर नातं जुळायला आणि टिकायला काहीच अवघड नाही. नात्यांची अजून एक गरज असते, जी कालांतराने दृढ होत जाते, ती म्हणजे, बोललेले तर समजणे, पण न बोललेही कळणे. आणि इतर गोष्टी जरी यथायोग्य असल्या तरी माझ्या मनातलं, तुला न सांगता कळणं हे प्रेमाचे पराकोटीचे असण्याचा एक पुरावा. ह्याच एकामुद्द्यावरून जोडप्यांमध्ये, भागीदारांमध्ये, किंवा कुठल्याही दोन माणसांमध्ये वाद, तंटा, मतभेद, किंवा अगदी तफावत ही होऊ शकते. त्यामुळे शब्दांच्या पालिकडलिही एक भाषा आहे जी नात्यात रुळणे गरजेचे असते. 

अश्या कळण्याच्या प्रवासाबद्दलच कवी म्हणतो, की तू न बोलता ही मला समजतं, तुला काय म्हणायचं. त्यासाठी, देहबोली, एखादा कटाक्ष, एखादा उसासा, एखादा हुंदकाच पुरेसा असतो. हे कळतात म्हणजे ती एक तपश्चर्याच आहे. चार चौघात, एकमेकांचे हसं हाऊ न देता व इतरांना कळू न देता, जेव्हा नजरेतून, किंवा कोपरखालीतून खुणावलं जातं तेव्हा हे पाठ गिरवायला सुरवात होते. मग हळू हळू प्रगती करत अगदी अर्धविराम किंवा विलंब ह्यातलं ही भाष्य लक्षात यायला लागतं.
ह्याच जाणिवा टोकदार करत, कवी म्हणतो की तू तर माझ्यापेक्षा भारी आहेस. कवी इथे थोडी चतुराई वापरून, समोरच्यावर कुरघोडी करू पाहतो. तो म्हणतो की मौनाचीही भाषा यायला लागली आहे. माझ्या मौनातले इशारे सुद्धा तुला समजतात. जर नात्यामध्ये इतकी पारदर्शकता आणि समज असल्यास, उगाच शब्द वापरून कशाला गैरसमजुतीला किंवा भलत्या सलत्या अर्थांना जन्माला घालायचं? 

चुकीचे शब्द, किंवा चुकीच्या पद्धतीनं बोलले जाणारे शब्द ह्यांचा वैतागच नको. आणि म्हणून त्यासाठी आपल्या कुठल्याच संवादामध्ये आपण शब्दांचा वापर करणं टाळूयात. पण ह्याचा अर्थ असा नाही की संवादच नको. संवाद हवा पण तो कसा, एकमेकांना कळून घेण्यासाठीच तो संवाद आहे. कळण्याच्या कळण्याशी संवाद. हे कौशल्यं मिळवून, स्व-प्रसतिक्षिकरण ह्या म्यासलोज च्या सिद्धांताप्रमाणे, मानवाची सर्वात पराकोटीची गरज ही असू शकते. आणि असे झाले तर कितीतरी संवाद हळूवारपणे, बिना भांडण तंटा, अलगद, कोमलपणे पार पडतील.

कवीने ह्या कवितेतून नात्याचं जणू काही एक गुजच सांगितलं आहे. अश्या ह्या अत्यंत प्रतिभावान आणि  सहज, सोप्या भाषेत आयुष्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या श्री. सुधीर मोघे साहेबांना मनाचा मुजरा.

© राहुल शिंदे

© - Rahul Shinde 28/JUN/2020 

Comments

Post a Comment