गुड न्यूज

DAY 29/30/29/JUNE/2020

अरे एक ‘गुड न्यूज’ आहे बरका ओंकार, अभिजित म्हणाला. ‘गुड न्यूज' काय? आता अभिजित आणि मी इंजीनियरिंग च्या एकाच वर्षाला पण वेगवेगळ्या कॉल्लेगे मध्ये शिकत होतो. पण दोघंही मेकॅनिकल इंजीनियरिंग ला, दुसऱ्या वर्षाला. आता त्या काळात, त्या वयात आमच्या सारख्यांना गुड न्यूज म्हणजे काय तर सिनेमाला जाणे, किंवा बाहेर हादडायला जाणे, किंवा नात्यात ल्या कोणाची तरी मुंज, किंवा लग्न ठरणे.

ह्या पलीकडे काय? अगदीच टोकाचे म्हणजे कॉलेज ला सुट्टी मिळणे, परीक्षा रद्द होणे किंवा सबमिशन ची तारिख पुढे ढकलणे.


कसली गुड न्यूज असेल ह्याच्या विचारात मग्न असतानाच अभिजित म्हणला,”अरे,आत्याचं लग्न ठरलं!” ही आत्या म्हणजे, अभिजीत च्या वडिलांची कुठलीतरी लांबची बहीण. पण तिचं कोणीच नसल्यामुळे, ती अभिजीत च्याच घरी राहायची. तिचं नाव मीना. मीना आत्या तशी वयाने मोठी होती. जवळ जवळ ३२-३४वर्षांची असेल. त्याचे वडील मीना आत्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायचे. तिलाही ह्या मोठया भावा शिवाय कोण.


"अरे सांगतोस काय? वा! मस्त! कधी आहे ?" " पुढच्या महिन्यात." अभिजित म्हणाला.

मग बघता बघता लग्नाचा दिवस आला. लग्न अगदी छान पार पडले. अभिजीत च्या वडिलांनी सगळी सोय चोख केली होती. पाठवणी झाली. मुली कडच्या सगळ्यांनी डोळे पाणावून निरोप दिला. मंडळी सगळी घरी आली.


अभिजित कडे माझे येणे जाणे चालूच असायचे. आमचे अगदी घरोबयाचे संबंध. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरी अगदी पडीक असायचो. असेच एक दिवस मी त्याच्याकडे गेलो असताना बघीतलं तर मीना आत्या आणि तिचे यजमान. मी जवळ जवळ सहा महिन्यांनी भेटत होतो मीना आत्याला. तिने अगदी प्रेमाने चौकशी केली माझी. सगळे बसले होते हॉल मध्ये. सगळे खुश दिसत होते. मीना आत्या लाजल्यासारखी दिसत होती. अभिजीतची आई मला म्हणाली, "ओंकार, माहितीये का, एक गुड न्यूज आहे! ओळख काय?"


आता मी माझ्या अल्प बुद्धीला पटेल असा हिशेब केला. नुकतंच लग्न झालेलं. सहा महिने झालेलं. सगळे खुशीत दिसताहेत. म्हणजे गुड न्यूज एकच असणार. अगदी आत्म विश्वासाने मी म्हणालो, "वा! काय सांगताय काय!अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!!" सगळे हसले. मीना आत्या लाजल्या आणि 'थँक् यू थँक् यू'म्हणाल्या.


मग म्हणल्या, "ह्यांनी पुढाकार घेतला, म्हणून झालं. नाहीतर काही शक्य न्हवतं". आता मी चक्रावलो. म्हणजे हे सांगायची के गरज आहे. सगळ्यांना ते माहितच आहे की. मीना आत्या आणि त्यांची यजमान इतके बिनधास्त असतील असे वाटले न्हवते.


अभिजित चे वडील म्हणाले, "मग, कधीची तारीख दिलीये?" "पुढच्या महिन्याची १ तारीक". आता मला खरंच चक्कर यायला लागली होती. हे काय चाललंय काय? मीना अत्याचे यजमान म्हणाले, "मी खरं म्हणत होतो हिला, आधीची तारिख घे. पण ही म्हणाली उगीच घाई नको. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा म्हणजे, जरा भीती वाटते. थोडी मनाची तयारी करायाला वेळ घेतला पाहिजे."


हे सगळं बोलणं ऐकून मी आता बेशुद्ध पडणार असं मला वाटायला लागलं. मी पटकन काही तरी निमित्त काढून, अभिजीतला बाहेर येण्यासाठी खुणावत बाहेर अंगणात गेलो. अभिजित लगोलग मागे आलाच. "काय तर काय झालं. असा एकदम के बाहेर निघून आलास?" "अभ्या, अरे काय चाललंय काय आत?" "काय चाललंय?" अभिजित नी आश्चर्याने विचारलं. "अरे ते सगळं इतक्या उघडपणे कसं बोलू शकतात? आणि ते इतक्या वर्षाने पुंन्हा एकदा, बया वाक्याचा अर्थ काय रे मित्रा?"


"अरे बाबा, मीना आत्या बऱ्याच वर्षांपूर्वी बँकेत नोकरी करत होती. मग मध्ये तिने नोकरी सोडून दिली आणि घरी आईच्या मदतीला थांबली." आता मला खरंच वेड लागणार होतं. हा अभ्या ही असं विचित्र बोलत होता. "अरे बाबा, नोकरीचा इथे काय संबंध?" काय मूर्ख माणूस आहे हा, ह्या भावनेनं माझ्याकडे बघत म्हणाला, "अरे म्हणजे काय? मीना आत्याला नोकरी लागली ना नवीन. तेच तर सांगत होती ती." "ऑ? अरे मग ते गुड न्यूज?" " अरे बाबा, नवीन नोकरी मिळाली तिच गुड न्यूज!"


"काय?!!" मला चटकन सगळी गोष्ट लक्षात आली. गुड न्यूज चा अर्थ मी भलताच लावला होता आणि म्हणून सगळं घोटाळा झाला होता.


मी सॉरी सॉरी म्हणत, अभिजित ला घेऊन पुन्हा आत गेलो. हुश्श करून बसलो आणि गुड न्यूज चा पेढा, स्वतःशीच हसून मनसोक्त खाल्ला.


© राहुल शिंदे

© - Rahul Shinde 29/JUN/2020 https://bit.ly/31pkmdr

Comments

Post a Comment