खंत



DAY 20/30/20/JUNE/2020



खंत

वडीलधाऱ्या ह्या पायांना,

शतादिकांचे हात स्पर्शती

खंत एकच की उरला नाही

एकही हात खांद्यावरती.


- कुसुमाग्रज



वरील कविता आपले लाडके कुसुमाग्रज ह्यांची आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली ती. चारच ओळी आहेत, तरी वर्धक्याचा आशय इतका नेमकेपणाने मांडला आहे. खरंच, म्हातारपणात आपण मांडायला सुरू केलेला संसार, अगदी बहरून, विस्तारून आपल्या डोळ्यासमोर खुललेला असतो. मुलं, मुली, सुना, जावाई, नातवंडं सगळे डोळ्यासमोर असतात. प्रेमाने आपली दखल घेत असतात, विचारपूस करत असतात. नातवंडं 'आजोबा आजोबा' म्हणून फेर धरत असतात. त्यांच्यामध्ये आपण मस्त रमलो असतो. आपला सगळा दिनक्रम त्यांच्या प्रमाणेच आपण आखलेला असतो. वर्तमानपत्र, टीव्ही, इतर बाहेरचे साहित्यिक कार्यक्रम, मित्रमंडळींशी गप्पाटप्पा सगळं अगदी दृष्ट लागावं असं चालू असतं.

इतक्यात अचानक एके दिवशी सकाळी बातमी येते की आपला कॉलेज पासून चा जिवलग सवंगडी आपल्याला सोडून देवाघरी गेला. मनात चर्रर्र होतं. काळीज फाटते. असे एक एक सवंगडी सोडून गेले की धास्ती वाटू लागते. पुलंचा अंतू बरवा म्हणतो तसं, 'इजा झाला, बिजा झाला आता तिज्याची वाट बघत आहे' हाही विचार मनात येत असेल. आज झोपायला जायच्या आधीच डोळे मिटतात किंवा सकाळी डोळे उघडायचा आतच डोळे मिटतात की काय अशी हुरहूर मनाला लागताच असेल.

त्यामुळे असा एक एक गाडी गळत चालला की आयुष्यात त्यांची कमतरता भासत असणारच. अड्ड्यावर गेल्यावर त्या मोकळ्या खुर्च्या मनाला छळत असणारच. आणि काही विशेष प्रसंगी, आपल्या संपन्न आयुष्यात हा नाही, तो नाही, ती नाही ह्याची खंत अगदी मनाला खोलवर रुतत असणार. बोलणार तरी कुणाजवळ, सांगणार तरी कोणाला. ऐकणारा, समजणाराच गेला. आता सुख दुःख कोणाबरोबर वाटायचं? मनातलं सगळं सगळं कुणासमोर मोकळं करायचं? चूक कुणाचीच नाही हो. जे घरात आहेत त्यांना ऐकायला वेळ नाही आणि ज्यांना ऐकायला वेळ होता ते आता भूतलावर नाहीत. मग आम्ही वृद्धांनी कोणाकडे पाहायचं?

अखेर काय, दर वेळी सवंगडी कमी कमी होत गेले तरी आपण डाव खेळत राहायचा. आपण आऊट होईपर्यंत. ते गेल्याची खंत वाटली तरी, उरलेला खेळ आपण प्रामाणिक पणे न खेळल्याची खंत राहता कामा नये.




© राहुल शिंदे














© - Rahul Shinde 20/JUN/2020








Comments