टांगेवाला
DAY 22/30/22/JUNE/2020
टांगेवाला
एक भला सायेब
माह्या टांग्या मधी बसला
काय सांगू गड्या
त्याचा रुबाब कसला
रेशमी रुमाल, उलनचा सूट
आयना झक मारल, असा चकचकीत बूट
सोनेरी चमचम, घड्याळाची साखळी
वेळ बघून त्याने खिशामध्ये टाकली
बोटांना सजवायला खड्याची अंगठी
नशिबाची जणू फुल्ल गॅरंटी
गोरपान रूप त्याचं, मिशीवर ताव
मला म्हणाला "ए! जलदी लेके जाओ"
हहरर..हाईक.. करत मी ओढला चाबूक
टिक टॉक तालात पोटाची भूक
एक एक मागे टाकीत मैलाचा दगड
संग धावती चिंच, पिंपळ, अन वड
सायबाचा टुमदार बंगला आला
"ए! रुक जाओ इधर" साहेब म्हणाला
"कितना हुआ" म्हणत
खिशातून गुबगूबुत पाकीट काढले
सवारीचे पैसे हातात वाढले
"मेहरबानी" म्हणत मी पैसे कनवटीला बांधले
मोडीचे नाणे सायबाला परतवले
साहेबाच्या नोटेला अत्तराचा सुवास
माझ्या नाण्याला फक्त घामाचा वास,
हहरर...हाईक...करत माझा पुढचा प्रवास,
हहरर...हाईक...करत माझा पुढचा प्रवास.
- © राहुल शिंदे 
© - Rahul Shinde 22/JUN/2020     

वाह! 👌 अप्रतिम सुंदर शब्दचित्र!
ReplyDelete